Thursday, March 31, 2011

नववधू प्रिया मी बावरते..

नववधू प्रिया मी बावरते..

पदर सावरत..... मुंडावळ्या आवरात ती हलकेच मंडपात प्रवेश करते.. सर्व जणांच्या नजरा तिच्यावर खिळतात.... हळदीच्या पिवळ्या रंगात दोघे न्हाणून निघतात अन खुलून हि येतात. अग्निहोमाच्या बाजूने फेरे घेताना करंगळी हातात घेताना मनात एक ओढ निर्माण होत असते.... सप्तपदी चालताना मनात विचार येतात कि असेच आम्हा दोघांना आयुष्यभर साथ देत असेच चालायचे आहे....अधून मधून होणाऱ्या नजर भेटा... हाताचे होणारे ओझरचे स्पर्श...अंतरपाटाआडून तिला हळूच पाहायचे.. आजचे सौंदर्य हे आगळेच असते.. पण तिच्या मनाची चलबिचल हि तेवढीच आगळी.... कुणाची तरी नजर आपल्यावर अतिशय उत्सुकतेने न्याहाळत आहे याची जाणीव तिला तिच्या सख्या देतच असतात.... एकमेकांना घास भरवताना.... दोघेही अतिशय अनोळखी परंतु का कुणास ठावूक थोडे हसत लाजत हे क्षण अनुभवत असतात...

कसे हे क्षण असतात ना आयुष्यात एकदाच येणारे.. सुख हि एकदाच देणारे पण ओढ मात्र किती असते ना... प्रत्येक मुलीच्या आणि मुलाच्या आयुष्यात येणारे हे क्षण... आहेत पुष्कळ हळवे अन नाजूक.. बस..... या कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला कि एकमेकांच्या साथीने हे क्षण आयुष्यभर म्हंटले तरी आठवणीच्या शंख शिपल्यात मोती प्रमाणे चमकत राहतात....

एक प्रसन्न सकाळ....

एक प्रसन्न सकाळ....

मातीचे सुंदर असे डोंगर... म्हणजे जणू काही साचेबद्ध पायऱ्या.... त्यावरून वाहणारे संथ पण तालबद्ध पाणी...निर्मळ आणि स्वच्छ ... आणि मी हिरव्या रंगाची साडी नेसून  त्यावर साजेशी  सोनेरी रंगाची चोळी.... केस ओले आणि पाठीवर मोकळे... हातात कंकण.. त्या दृश्याचा आनंद घेत उभी आहे... इतक्यात रघु... (आमचा कुत्रा) मला नेहमीप्रमाणे उठवण्यास येतो.. त्याची सकाळी फिरायला जायची वेळ झालेली होती.. जाग येते... तेव्हा लक्षात येते कि मी एक सुंदर स्वप्नात होते...  त्याला फिरायला घेवून गेले... आंघोळ वैगेरे आवरून मी.. चहा घेणार तितक्यात आईने सांगितले आज पूजा करून घे... पुष्कळ दिवसांनी देवाला भेटण्याचा योग आला... हम्म तसा रोज फक्त हात जोडून अथर्वशीर्ष किंवा स्तवन म्हणण्याइतकाच .. आज चक्क पूजा करायची होती.. देवांना ताब्याच्या ताटात ठेवून त्यांना शंभो घातला (आंघोळ घातली) वस्त्र चढवले... अष्टीगंध लावले.... फुल वाहिले.. अन तेल ओतून समई लावली.... अतिशय प्रसन्न वाटले  देवघर उजळून आले ... नेहमीच मला आवडणारी संध्याकाळ.. तिचे  विशिष्ट आकर्षण हि .. पण ती तेवणारी समई पाहिल्यावर सकाळचे हि कौतुक करावेसे वाटले.. आणि मनात अजूनही तो प्रसन्न पाण्याचा झरा तर वाहतच होता... गणपती स्तोत्र म्हटले. देवांना अंघोळ घातलेले पाणी कोरफडीच्या झाडाला घातले... आणि ताब्यातले पाणी तुळशीला घालताना... एक जुनी पण खूप स्पर्श करून जाणारी लहानपणीची गोष्ट आठवली... आमच्या बाजूच्या आज्जीनी तुळशीचे रोप आणले होते. त्याच्या कुंडीतली तुळस जास्त दिवस राहायचीच नाही.. एक दोन महिन्यातच ती जळून जायची. मी अंगणात बसले होते .. मला आवाज दिला आणि कुंडीत ती तुळस लावायला सांगितली.... एक दोन महिन्याने तुळस चांगली वाढली.... आजीनी आईला सांगितले माझ्या हाताने तुळस लावली तर चांगली वाढते... मग आमच्याहि कुंडीत एक तुळशीचे रोप मी लावले आणि ती चांगली वाढली  सुद्धा.. आताची तुळस हि आईने लावलेली पण बहरून आलेली.. तेव्हा पासून तुळस म्हटले कि माझे मन त्या जुन्या प्रसंगापाशी घुटमळत राहते.. आणि तुळशी सोबत एक मर्म बंध जोडले गेलेत जणू काही... तुळशीला पाणी घालताना समोरच्या बिल्डिंगमधल्या काचेच्या खिडकीवर पडणारे सूर्याचे कोवळे किरण परावर्तीत होवून माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होते...त्यात हा रघु सारखा पायात घुटमळत होता नेहमीसारखा.... चाळीत असताना सकाळी सर्व आंगण पाणी टाकून रोज साफ करायचे आणि रांगोळी काढायचे आणि आत  बिल्डिंगचे असणारे ते टीचभर आंगण... झाडूने साफ केले.. आणि एक सुरेख अशी रांगोळी काढली अन त्यावर हळदी कुंकू व्हायला नक्कीच विसरले नाही.. बाजूला बसून रघु न्हाळत होता जणू काही त्याला कळत आहे..... पण अजून हि  ते झुळझुळ वाहणारे पाणी... आणि ते उत्सुकतेने पाहणारी मी.... डोळ्यासमोर ते चित्र तसेच उभे आहे....

Monday, March 28, 2011

मनातील गाणी...











गाणे म्हंटले कि मन तन त्या तालावर झुलू लागते .....प्रत्येक गाण्याचा आपण एक भाग आहोत असेच काहीसे वाटते... आयुष्यातल्या चांगल्या वाईट प्रसंगावरून, बऱ्या-वाईट अनुभवावरून गाण्याची निवड आपोआप होवून जाते... वयोमानानुसार हि गाण्याची पसंती नोंदवली जाते.. आता लहानपणी आपण राजा राणीच्या आणि परयाच्या कथा, पावसाची गाणी यातच मन रमलेले असायचे. आयुष्य चांगल्या अनुभवावर आहे तोपर्यंत तरी साधी आणि सरळ गाणी आवडतात.... मस्तइ धिंगाणा असेल तर धमाल धिंगाणा असलेली गाणी आवडतात. प्रेमात पडले कि जरा हलकी मनाला भावणारी गाणी आवडतात मग असे कधी अशी गाणी कानावर पडली कि नकळत आपण आठवणीच्या झुल्यावर झुलू लागतो...मग आपल्या गाण्यांच्या आवडीवरून आपल्या मनाचे प्रतिबिंब झळकू लागते... आणि कधी कधी समोरच्या माणसाला आपल्या मनाचा थोडासा कानोसा घेतो. प्रेमभंग, विश्वासघात इति... असा काही अनुभव असेल तर त्याला साजेसे गाणेच आवडते... मग ते दिवसातून १०० वेळा ऐकले तरी कमीच वाटते.... मग थोडा काळाची सावली सरू लागते.... वेळ पुढे ढकलली जाते.... अन असेच अचानक त्या गणाचे बोल कानावर पडतात.... हृदयाची स्पंदने वाढू लागतात... श्वासाची गती वाढू लागते.. पोटात भीती दाटून येते ... आणि आठवणी परत जाग्या होवू लागतात.. हलकेच डोळ्यातून पाणी येवू लागते... एक एक गेलेला क्षण डोळ्यासमोर धडधड पुढे सरकू लागतात... त्याचे किंवा तिचे बोलणे, हसणे, भेटणे, डोळे, शेवटची भेट... सर्व काही डोळ्यासमोर ठाण मांडून बसते...अन मन विचार करू लागते का झाले असे.....

हि गाणी असतात मात्र विचित्र, कधी प्रेमळ, कधी हवीहवीशी वाटणारी... मनातील भावना व्यक्त करणारी, मग वाटते हे गाणे अगदी माझ्यासाठी आहे... अगदी मनाचा आरसा होवून आपल्या मनातील भावना आपल्याच दाखवू लागतात.... मोरपिसासारखी मनावर हळुवार फिरून जातात..... या गोष्टीला कोणीच विरोध करू शकत नाही... लहानापासून अगदी नव्वदीतल्या आजी आजोबानासुधा आपल्या आठवणीत घेवून जाणारी गाणी... मनाला भावणारी... हळुवार गालावर हसू आणणारी तर कधी नकळत डोळ्यातून अश्रू आणणारी.... मनातील गाणी...

खिडकी....




प्रत्येकाच्या मनाचा हळुवार कोपरा.. आठवणीचा साठा.... भावनांचा कोठा.... मग हि खिडकी कुठलीही असो... बसची.... ट्रेनची...घरातली... बिल्डींगची.. शेवटी खिडकी हि खिडकी... भावना त्याच... आठवणीही त्याच...
कधी पण लांबचा प्रवास असो किंवा जवळचा... भले किती पण जागा असो आपण जाऊन पकडतो ती खिडकी... आयुष्यात घडून गेलेल्या घडामोडी आपल्याही नकळत आठवण्यास भाग पडते ती खिडकी... आठवणीची गर्दी जिथे होते ती खिडकी... कधी अस्वस्थ करणारी खिडकी... डोळ्यात पाणी उभी करणारी खिडकी....स्वत:पासून हि लपवून ठेवलेल्या आठवणी समोर उभी करते ती आठवणी.... प्रत्येक क्षणाबरोबर मागे पडणारी झाडे, घरे, ढग, माणसे आपल्याल्या काही क्षण मागे घेवून जातात.. मग शाळेचे दिवस, लहानपणीचे दिवस, कॉलेजचे दिवस, काही चांगले आणि कधी वाईट प्रसंग आठवू लागतात पावसाळ्यात खिडकीवर उडणारे थेबातील प्रतीथेंब उडून जेव्हा गालावर पडतात तेव्हा काहीश्या सुखद आठवणी जाग्या होतात.... प्रेमभंग, प्रेमातील आणाभाका, नववधूला काहीसे प्रणयाचे क्षण, सासूरवाशीन ला माहेरच्या अंगणातील खेळण्याचे दिवस आठवू लागतात... आजी आजोबाना आपल्या तारुण्याचे दिवस, छोट्या मुले काहीशी गाणी गात.. हसत त्या खिडकीचा आनंद उपभोगत असतात... आठवणीचा विसावा हि खिडकी प्रत्येकाला एक क्षणिक आनंद देवून जाते.. घरातल्या खिडकीत एक वाफालेला चहाचा कप हातात घेवून.. संध्याकाळीच्या सोनेरी किरणाचा आस्वाद घेतहि आठवणीच्या गाव रोज जायला आपण कंटाळत नाही... मनाला स्पर्श करून जाते हि खिडकी...कडू आणि गोड आठवणीचा वर्षाव होतो ती जागा म्हणजे खिडकी.... कितीही मन तणावयुक्त असो... हलकेच खिडकीत जाऊन बसलो कि मनाला एक हळुवार पणा जाणवतो... बरे डोळ्यातून अजून पाणी येवो पण मन मात्र हलके होवून जाते....

दिवसभर म्हटले तरी आपण त्या खिडकीत सहजपणे बसू शकतो... मग आपल्याला गाड्यांचा, हॉर्नचा, मुलांच्या ओरडण्याचा कुठल्याही प्रकारच्या आवाजाचा त्रास जाणवत नाही.... बस फक्त स्वतः आणि आठवणी त्या खिडकीच्या सानिध्यात राहून आपण हरवून जातो

Thursday, March 24, 2011

येशील ना रे...... ???

 

मनातील वादळ दिवसेन दिवस वाढतच चालले आहे. आणि तुझ्याबद्दल मनातील प्रेम आणि राग सुद्धा ..
का छळतोस मला किती त्रास देशील... मनातील प्रेम खूप जपून ठेवतेय  रे मी फक्त तुझ्यासाठी पण तू मात्र किती कठोर  आहेस रे......कुठे आहेस तू...  
तू कोण आहेस ? कसा दिसतोस ?? काय करतोस ? मला काही माहित नाही पण हे मात्र विधिलिखित आहे कि
तू माझ्या आयुष्याचा  एक भाग आहेस.....माझ्या आयुष्याची पहाट आहेस...  एक प्रसन्न  सकाळ....एक कोरडी दुपार.. एक सोनेरी संध्याकाळ अन चंदेरी रात्र आहेस..... 
प्रत्येक संध्याकाळ तुझ्या आठवणीने दाटून येतात.... आठवणी ??? प्रश्न पडला असेल ना... कि मी तुला पाहिले नाही भेटले नाही आणि मग आठवणी कुठून आल्या ???
अरे वेड्या...तुला माझी आठवण येत नाही पण मी मात्र नेहमीच कल्पनेच्या जगात तुझ्या बरोबरच असते... सकाळी उठल्यावर सूर्याच्या कोवळ्या किरनामध्ये तुला पाहण्याचा अतोनात प्रयत्न  करते...
दारासमोर रांगोळी काढताना आज नक्कीच  तुझे स्वागत होईल असा एक विश्वास जपून ठेवते... दुपारी रखरखत्या उन्हात चालताना तुझ्या प्रेमाच्या सावलीचा आभास साठवून ठेवते.....
संध्याकाळी खिडकीत उभे राहून त्या मावळत्या सूर्याकडे पाहत असताना मन अजून अधीर होवून जाते.... तू माझ्या सोबतच आहेस हा खेळ उगाचाच रोज खेळत राहते... आणि मन कातर होवून जाते.....
रात्री त्या चंद्राला पाहिले कि आपसूकच डोळ्याच्या नकळत पापण्याचे ढग सारून मेघ बरसू लागतात... ओठ थरूथरू लागतात... आवंढा गिळत कसे तरी स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात तुला आठवू लागते
भीती वाटते रे... ओठावरील शब्द ओठावरच विरून तर जाणार नाहीत ना ... मनातील प्रेम मनातच आटून तर जाणार नाहीत ना..... भावना कायमच्या निशब्द तर होणार नाहीत ना.. तू का माझ्याशी बोलत नाहीस.... 
सोळा श्रींगार करून सुद्धा माझे सौंदर्य खुलत नाही कारण त्यावर तुझ्या नजरेचे काजळ नाही.... आरशात पाहून सुद्धा स्वतःचे प्रतिबिंब अपूर्ण दिसते.... डोळ्यातील अश्रुंचे थेंब गालावरून हाताच्या तळव्यावर पडून तळे  साचले आहे रे... मग कधी वाटत तेच साचलेले तळे तुला दाखवावे.... माझ्या प्रेमाची उत्कंठा तुला कळेल का??? आता मी ठरवलेच आहे... नाही तुझी वाट पाहणार.... तुला यायचे तेव्हा ये.... पण हो एक लक्षात ठेव... ह्याला प्रेमाची धमकी   म्हणलास तरी चालेल मला... पण तुला मी खूप मारणार आहे... तुझ्याशी रुसवे धरणार आहे... तुला पण खूप त्रास देणार आहे... मला वेडाबाई म्हण वेधली   म्हण चालेल मला .. पण तुझ्या हे शब्द ऐकण्यासाठी नक्कीच तुझी वाट पाहेन.... येशील ना रे...... ???

Monday, March 21, 2011

तो रंग आहे प्रेमाचा..

रंगाची उधळण सुरु झाली कि मला तुझी आठवण येते...
सप्त रंग उधळले जातात तेव्हा त्यात... मी माझा एक रंग शोधते... जो  मला भावून जाईल
न जाणो किती दिवसापासून त्या रंगाची वाट पाहत आहे..
कधी तरी तो रंग तुझ्या हातात यावा.. असे सारखे  वाटत राहते...
होळीचा सण आला कि आपसूकच या मनाची चलबिचल चालू होते... आणि एक अनामिक ओढ लागते ..  त्या रंगाची अन तुझ्या येण्याची ही...
का कुणास ठावूक आज इतके दिवस झाले पण रंगापासून स्वतःला वंचितच ठेवले
अगदी वेडा बाईच आहे मी... जणू त्या रंगाने मला काहीतरी होणारच आहे.... छे मनाचे खेळ ते...कुणालाच रंग लावू द्याच नाही का पाणी उडवू द्याचे नाही....
लाल पिवळा हिरवा जांभळा विविध रंगी पाणी पाहायला मजा वाटते.
मग कधीतरी खिडकीत उभे राहून दुसऱ्याना खेळताना पाहण्यातच समाधान मानायचे...
प्रत्येक रंगांचे सौंदर्या हे आगळेच.. नेहमीच खुलून दिसणारे... स्वतःचे अस्तित्व थाटात सांभाळून ठेवणारे असेच काहीसे रंग आपल्या आयुष्यात नकळत येवून जातात... कधी खूप सुखावून तर कधी मनाला बोच लावून जातात असा एक रंग आहे .... जो मला तुझ्याकडून हवा आहे... तुझ्या स्पर्शातून तो मला हवा आहे..

जो अलगद माझ्या गालावरून ओघळेल आणि मनाला स्पर्श करून जाईल... मी त्या रंगाची आतुरतेने वाट पाहत आहे जणू काही चातक त्या ढगाळलेल्या आकाशाकडे टक लावून त्याची वाट पाहतो तसेच काही समज तो रंग कधीच माझ्या गालावरून उतरणार नाही तर.... तो दिवसेन दिवस त्याचे सौंदर्य खुलून येईल...तो रंग आहे प्रेमाचा.... कसा असेल हा रंग   ... मला सुखावून जाईल... देशील ना हा रंग मला...... ????