Saturday, April 13, 2019

नात्याची गुंफण घे तू सांभाळून
अलगद पावलांनी येई तुझ्या जीवनी
उधळ हे क्षण त्याच्या  समवेत
आठवणी या अनमोल घे तू कवेत

Monday, April 8, 2019

तो म्हणाला,
आयुष्य नव्याने  सुरु करूया
मी म्हंटल मला थोडा वेळ हवा आहे
पण काहीच दिवसात कळले
याचा जीव माझ्यावर जडला आहे
अन मग काय..  मनात किंतु न ठेवता
तुला आयुष्यात प्रवेश दिला आहे 

Monday, November 20, 2017

तुझ्या श्वासांची ऊब
अन् तुझे बाहुपाश
तुझे अगतिक स्पर्श
बस्स आणि काय मागु तुला

Wednesday, June 4, 2014

आज सकाळी नेहमी प्रमाणे उठून आन्हिक आवरत होते. तितक्यात कुणीतरी येण्याची चाहूल ऐकू आली. दाराकडे कान टवकारले तर काही चाहूल नाही नंतर कळले कि हि चाहूल खिडकीतून आहे. मग गोंधळले कि पाहुणे नेहमी दारातून येतात मग खिडकीतून कोण बरे येतेय. म्हणून पुढे सरसावले. तर चक्क पाऊस राजाचे आगमन होत होते. त्याचा आनंद घेतेच तोपर्यंत आईचा किचन मधून आवाज "अग पाऊस आला, खिडकीत काही सामान आहे ते आत घे. आणि मी पटकन बेडरूमच्या रूम मध्ये जाऊन खिडकीत काही पिशव्या होत्या त्या आत मध्ये घेतल्या. निघताना छत्री शोधायची घाई. घरातून बाहेर पडले... रस्ते ओले झाले होते.. बिल्डींगच्या आवारातल्या गाड्या भिजल्या होत्या.. बिल्डींगचा गेट भिजला होता... पुढे जशी येवू लागले तसतसे माझे पाय भिजू लागले... एक खड्डा दिसला त्यापासून मी जर अंतर ठेवून चालत होते... का ? तर अंगावर पाणी उडू नये म्हणून ... हळू हळू मी  जुन्या आठवणीं मध्ये जाऊ लागले. पावसाची चाहूल लागायच्या आधी घराची घराच्या कौलांची पत्र्यांची डागडुजी करणे चालू व्हायचे. एवढे सर्व करूनही जर कुठे पाणी गळू लागलेच तर मग ते तिथे बादली, जर्मनचा टोप, तांब्या असे काही तरी ठेवायचे.. ते भरले कि परत ते ओतून यायचे. कधी घरात पाणी शिरायचे, कधी जमिनी खालून पाणी यायचे मग ते पुसत राहायचे किंवा मग तिथे एखादा कपडा ठेवायचा. पत्र्याच्या ओघळतिला   टीप टीप गळणारे पाणी हातावर घ्यायचे आणि एकमेकांच्या अंगावर उडवायचे. हे सगळे करण्यात एक मज्जा तर होतीच  खुपश्या आठवणी लहानपणीच्या...  शाळेत असताना आपण पाऊस जास्त आला कि आज शाळा लवकर सुटणार हे नक्की असायचे... रेनकोट, गम बूट याचे नवलच भारी... एखाद्या खड्यात पाणी साचले असले कि त्यात मुद्दाम पाय टाकून ते पाणी उडवायचे.. कागदाच्या होड्या बनवायच्या पावसात भिजत त्या पाण्यात सोडायच्या.. तासंतास त्याच होड्या आणि तेच पाणी घरी आल्यावर दप्तर चेक करायचे.. पुस्तक भिजली असतील तर ती पंख्याखाली सुकवायची.... या सर्व विचारात कधी स्टेशनला आले कळलेच नाही... वाटले होते ट्रेन उशिरा असतील या विचाराने उभी होते आणि तितक्यात ट्रेन आली पण.. ट्रेन सुद्धा चक्क भिजली होती. ट्रेन मध्ये चढले आणि खिडकीतून पावसाच्या पाण्याला न्याहाळत बसले. पावसाला आणि मनाला  वय नसते... दोघे पण अवखळ... उनाड.. हवे तेव्हा बरसणार... हवे तेव्हा कोरडे पाषाण.... कोरड्या सुकलेल्या जमिनीला जसे पावसाचे पाणी भिजवून टाकते तसेच कधी कधी कोरड्या मनाला कोणत्या आठवणी कधी भिजवून टाकतील सांगू शकत नाही.. प्रत्येक पाऊस हा वेगळा असतो.. पावसाच्या आठवणी हि प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळ्या असतात.. कुणाला पावसाचा राग येतो कारण कपडे भिजतात.... तर कुणाला पावसाचा राग येतो कारण पाऊस त्यांना भिजवतो बहुरूप्या हा पाऊस..किती रूपे दाखवतो.. आणि आपण त्यात हरवून जातो.. कुणाच्या गोड आठवणी जाग्या करतो तर कुणाच्या कडू आठवणीना सहारा देतो.... पाऊस कधी नवखा नव्या नवरीसारखे धरतीचे सौंदर्य खुलवून टाकतो तर कधी अवखळ अल्लड लहान मुलासारखा खोड्या काढतो..

पावसाच्या आठवणी आपल्या मनात नेहमी ओल्याच असतात आणि राहतात.. त्याचा ओलावा हा प्रत्येक पावसाळ्यात ताजा होतो.. सुखावून देणाऱ्या ..

Thursday, March 31, 2011

नववधू प्रिया मी बावरते..

नववधू प्रिया मी बावरते..

पदर सावरत..... मुंडावळ्या आवरात ती हलकेच मंडपात प्रवेश करते.. सर्व जणांच्या नजरा तिच्यावर खिळतात.... हळदीच्या पिवळ्या रंगात दोघे न्हाणून निघतात अन खुलून हि येतात. अग्निहोमाच्या बाजूने फेरे घेताना करंगळी हातात घेताना मनात एक ओढ निर्माण होत असते.... सप्तपदी चालताना मनात विचार येतात कि असेच आम्हा दोघांना आयुष्यभर साथ देत असेच चालायचे आहे....अधून मधून होणाऱ्या नजर भेटा... हाताचे होणारे ओझरचे स्पर्श...अंतरपाटाआडून तिला हळूच पाहायचे.. आजचे सौंदर्य हे आगळेच असते.. पण तिच्या मनाची चलबिचल हि तेवढीच आगळी.... कुणाची तरी नजर आपल्यावर अतिशय उत्सुकतेने न्याहाळत आहे याची जाणीव तिला तिच्या सख्या देतच असतात.... एकमेकांना घास भरवताना.... दोघेही अतिशय अनोळखी परंतु का कुणास ठावूक थोडे हसत लाजत हे क्षण अनुभवत असतात...

कसे हे क्षण असतात ना आयुष्यात एकदाच येणारे.. सुख हि एकदाच देणारे पण ओढ मात्र किती असते ना... प्रत्येक मुलीच्या आणि मुलाच्या आयुष्यात येणारे हे क्षण... आहेत पुष्कळ हळवे अन नाजूक.. बस..... या कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला कि एकमेकांच्या साथीने हे क्षण आयुष्यभर म्हंटले तरी आठवणीच्या शंख शिपल्यात मोती प्रमाणे चमकत राहतात....

एक प्रसन्न सकाळ....

एक प्रसन्न सकाळ....

मातीचे सुंदर असे डोंगर... म्हणजे जणू काही साचेबद्ध पायऱ्या.... त्यावरून वाहणारे संथ पण तालबद्ध पाणी...निर्मळ आणि स्वच्छ ... आणि मी हिरव्या रंगाची साडी नेसून  त्यावर साजेशी  सोनेरी रंगाची चोळी.... केस ओले आणि पाठीवर मोकळे... हातात कंकण.. त्या दृश्याचा आनंद घेत उभी आहे... इतक्यात रघु... (आमचा कुत्रा) मला नेहमीप्रमाणे उठवण्यास येतो.. त्याची सकाळी फिरायला जायची वेळ झालेली होती.. जाग येते... तेव्हा लक्षात येते कि मी एक सुंदर स्वप्नात होते...  त्याला फिरायला घेवून गेले... आंघोळ वैगेरे आवरून मी.. चहा घेणार तितक्यात आईने सांगितले आज पूजा करून घे... पुष्कळ दिवसांनी देवाला भेटण्याचा योग आला... हम्म तसा रोज फक्त हात जोडून अथर्वशीर्ष किंवा स्तवन म्हणण्याइतकाच .. आज चक्क पूजा करायची होती.. देवांना ताब्याच्या ताटात ठेवून त्यांना शंभो घातला (आंघोळ घातली) वस्त्र चढवले... अष्टीगंध लावले.... फुल वाहिले.. अन तेल ओतून समई लावली.... अतिशय प्रसन्न वाटले  देवघर उजळून आले ... नेहमीच मला आवडणारी संध्याकाळ.. तिचे  विशिष्ट आकर्षण हि .. पण ती तेवणारी समई पाहिल्यावर सकाळचे हि कौतुक करावेसे वाटले.. आणि मनात अजूनही तो प्रसन्न पाण्याचा झरा तर वाहतच होता... गणपती स्तोत्र म्हटले. देवांना अंघोळ घातलेले पाणी कोरफडीच्या झाडाला घातले... आणि ताब्यातले पाणी तुळशीला घालताना... एक जुनी पण खूप स्पर्श करून जाणारी लहानपणीची गोष्ट आठवली... आमच्या बाजूच्या आज्जीनी तुळशीचे रोप आणले होते. त्याच्या कुंडीतली तुळस जास्त दिवस राहायचीच नाही.. एक दोन महिन्यातच ती जळून जायची. मी अंगणात बसले होते .. मला आवाज दिला आणि कुंडीत ती तुळस लावायला सांगितली.... एक दोन महिन्याने तुळस चांगली वाढली.... आजीनी आईला सांगितले माझ्या हाताने तुळस लावली तर चांगली वाढते... मग आमच्याहि कुंडीत एक तुळशीचे रोप मी लावले आणि ती चांगली वाढली  सुद्धा.. आताची तुळस हि आईने लावलेली पण बहरून आलेली.. तेव्हा पासून तुळस म्हटले कि माझे मन त्या जुन्या प्रसंगापाशी घुटमळत राहते.. आणि तुळशी सोबत एक मर्म बंध जोडले गेलेत जणू काही... तुळशीला पाणी घालताना समोरच्या बिल्डिंगमधल्या काचेच्या खिडकीवर पडणारे सूर्याचे कोवळे किरण परावर्तीत होवून माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होते...त्यात हा रघु सारखा पायात घुटमळत होता नेहमीसारखा.... चाळीत असताना सकाळी सर्व आंगण पाणी टाकून रोज साफ करायचे आणि रांगोळी काढायचे आणि आत  बिल्डिंगचे असणारे ते टीचभर आंगण... झाडूने साफ केले.. आणि एक सुरेख अशी रांगोळी काढली अन त्यावर हळदी कुंकू व्हायला नक्कीच विसरले नाही.. बाजूला बसून रघु न्हाळत होता जणू काही त्याला कळत आहे..... पण अजून हि  ते झुळझुळ वाहणारे पाणी... आणि ते उत्सुकतेने पाहणारी मी.... डोळ्यासमोर ते चित्र तसेच उभे आहे....

Monday, March 28, 2011

मनातील गाणी...











गाणे म्हंटले कि मन तन त्या तालावर झुलू लागते .....प्रत्येक गाण्याचा आपण एक भाग आहोत असेच काहीसे वाटते... आयुष्यातल्या चांगल्या वाईट प्रसंगावरून, बऱ्या-वाईट अनुभवावरून गाण्याची निवड आपोआप होवून जाते... वयोमानानुसार हि गाण्याची पसंती नोंदवली जाते.. आता लहानपणी आपण राजा राणीच्या आणि परयाच्या कथा, पावसाची गाणी यातच मन रमलेले असायचे. आयुष्य चांगल्या अनुभवावर आहे तोपर्यंत तरी साधी आणि सरळ गाणी आवडतात.... मस्तइ धिंगाणा असेल तर धमाल धिंगाणा असलेली गाणी आवडतात. प्रेमात पडले कि जरा हलकी मनाला भावणारी गाणी आवडतात मग असे कधी अशी गाणी कानावर पडली कि नकळत आपण आठवणीच्या झुल्यावर झुलू लागतो...मग आपल्या गाण्यांच्या आवडीवरून आपल्या मनाचे प्रतिबिंब झळकू लागते... आणि कधी कधी समोरच्या माणसाला आपल्या मनाचा थोडासा कानोसा घेतो. प्रेमभंग, विश्वासघात इति... असा काही अनुभव असेल तर त्याला साजेसे गाणेच आवडते... मग ते दिवसातून १०० वेळा ऐकले तरी कमीच वाटते.... मग थोडा काळाची सावली सरू लागते.... वेळ पुढे ढकलली जाते.... अन असेच अचानक त्या गणाचे बोल कानावर पडतात.... हृदयाची स्पंदने वाढू लागतात... श्वासाची गती वाढू लागते.. पोटात भीती दाटून येते ... आणि आठवणी परत जाग्या होवू लागतात.. हलकेच डोळ्यातून पाणी येवू लागते... एक एक गेलेला क्षण डोळ्यासमोर धडधड पुढे सरकू लागतात... त्याचे किंवा तिचे बोलणे, हसणे, भेटणे, डोळे, शेवटची भेट... सर्व काही डोळ्यासमोर ठाण मांडून बसते...अन मन विचार करू लागते का झाले असे.....

हि गाणी असतात मात्र विचित्र, कधी प्रेमळ, कधी हवीहवीशी वाटणारी... मनातील भावना व्यक्त करणारी, मग वाटते हे गाणे अगदी माझ्यासाठी आहे... अगदी मनाचा आरसा होवून आपल्या मनातील भावना आपल्याच दाखवू लागतात.... मोरपिसासारखी मनावर हळुवार फिरून जातात..... या गोष्टीला कोणीच विरोध करू शकत नाही... लहानापासून अगदी नव्वदीतल्या आजी आजोबानासुधा आपल्या आठवणीत घेवून जाणारी गाणी... मनाला भावणारी... हळुवार गालावर हसू आणणारी तर कधी नकळत डोळ्यातून अश्रू आणणारी.... मनातील गाणी...