Wednesday, June 4, 2014

आज सकाळी नेहमी प्रमाणे उठून आन्हिक आवरत होते. तितक्यात कुणीतरी येण्याची चाहूल ऐकू आली. दाराकडे कान टवकारले तर काही चाहूल नाही नंतर कळले कि हि चाहूल खिडकीतून आहे. मग गोंधळले कि पाहुणे नेहमी दारातून येतात मग खिडकीतून कोण बरे येतेय. म्हणून पुढे सरसावले. तर चक्क पाऊस राजाचे आगमन होत होते. त्याचा आनंद घेतेच तोपर्यंत आईचा किचन मधून आवाज "अग पाऊस आला, खिडकीत काही सामान आहे ते आत घे. आणि मी पटकन बेडरूमच्या रूम मध्ये जाऊन खिडकीत काही पिशव्या होत्या त्या आत मध्ये घेतल्या. निघताना छत्री शोधायची घाई. घरातून बाहेर पडले... रस्ते ओले झाले होते.. बिल्डींगच्या आवारातल्या गाड्या भिजल्या होत्या.. बिल्डींगचा गेट भिजला होता... पुढे जशी येवू लागले तसतसे माझे पाय भिजू लागले... एक खड्डा दिसला त्यापासून मी जर अंतर ठेवून चालत होते... का ? तर अंगावर पाणी उडू नये म्हणून ... हळू हळू मी  जुन्या आठवणीं मध्ये जाऊ लागले. पावसाची चाहूल लागायच्या आधी घराची घराच्या कौलांची पत्र्यांची डागडुजी करणे चालू व्हायचे. एवढे सर्व करूनही जर कुठे पाणी गळू लागलेच तर मग ते तिथे बादली, जर्मनचा टोप, तांब्या असे काही तरी ठेवायचे.. ते भरले कि परत ते ओतून यायचे. कधी घरात पाणी शिरायचे, कधी जमिनी खालून पाणी यायचे मग ते पुसत राहायचे किंवा मग तिथे एखादा कपडा ठेवायचा. पत्र्याच्या ओघळतिला   टीप टीप गळणारे पाणी हातावर घ्यायचे आणि एकमेकांच्या अंगावर उडवायचे. हे सगळे करण्यात एक मज्जा तर होतीच  खुपश्या आठवणी लहानपणीच्या...  शाळेत असताना आपण पाऊस जास्त आला कि आज शाळा लवकर सुटणार हे नक्की असायचे... रेनकोट, गम बूट याचे नवलच भारी... एखाद्या खड्यात पाणी साचले असले कि त्यात मुद्दाम पाय टाकून ते पाणी उडवायचे.. कागदाच्या होड्या बनवायच्या पावसात भिजत त्या पाण्यात सोडायच्या.. तासंतास त्याच होड्या आणि तेच पाणी घरी आल्यावर दप्तर चेक करायचे.. पुस्तक भिजली असतील तर ती पंख्याखाली सुकवायची.... या सर्व विचारात कधी स्टेशनला आले कळलेच नाही... वाटले होते ट्रेन उशिरा असतील या विचाराने उभी होते आणि तितक्यात ट्रेन आली पण.. ट्रेन सुद्धा चक्क भिजली होती. ट्रेन मध्ये चढले आणि खिडकीतून पावसाच्या पाण्याला न्याहाळत बसले. पावसाला आणि मनाला  वय नसते... दोघे पण अवखळ... उनाड.. हवे तेव्हा बरसणार... हवे तेव्हा कोरडे पाषाण.... कोरड्या सुकलेल्या जमिनीला जसे पावसाचे पाणी भिजवून टाकते तसेच कधी कधी कोरड्या मनाला कोणत्या आठवणी कधी भिजवून टाकतील सांगू शकत नाही.. प्रत्येक पाऊस हा वेगळा असतो.. पावसाच्या आठवणी हि प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळ्या असतात.. कुणाला पावसाचा राग येतो कारण कपडे भिजतात.... तर कुणाला पावसाचा राग येतो कारण पाऊस त्यांना भिजवतो बहुरूप्या हा पाऊस..किती रूपे दाखवतो.. आणि आपण त्यात हरवून जातो.. कुणाच्या गोड आठवणी जाग्या करतो तर कुणाच्या कडू आठवणीना सहारा देतो.... पाऊस कधी नवखा नव्या नवरीसारखे धरतीचे सौंदर्य खुलवून टाकतो तर कधी अवखळ अल्लड लहान मुलासारखा खोड्या काढतो..

पावसाच्या आठवणी आपल्या मनात नेहमी ओल्याच असतात आणि राहतात.. त्याचा ओलावा हा प्रत्येक पावसाळ्यात ताजा होतो.. सुखावून देणाऱ्या ..